तळेगाव : राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून याचा सर्वाधिक फटका कोकणला बसला आहे. परिणामी अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तळेगांव दाभाडे शहरातील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केले आहे.
जनसेवा थाळी, मराठा क्रांती चौक, तळेगाव स्टेशन येथे उद्या (रविवारी) दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांनी शक्य असेल ती मदत जमा करावी. कपडे, ब्लॅंकेट, चादरी, पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ, टूथ पेस्ट, पिण्याचे पाण्याच्या बाटल्या या स्वरूपात नागरिक मदत करू शकतात. नाशवंत पदार्थ व वस्तू टाळाव्यात. उद्या 3 वाजेपर्यंत जमा होणारी मदत दुपारी 4 वाजता कोकणकडे रवाना होणार आहे.
किशोर आवारे म्हणाले, कोकणात मुसळधार पावसामुळे अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी गावे, वस्त्यांमध्ये आणि तसेच शहरी भागात शिरले असल्यामुळे जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका कोकणला बसला असून कोकणवासीयांना मदतीची नितांत गरज आहे.
आता कोकणातील नागरीकांना तात्काळ मदत करण्याची विनंती आम्ही तळेगावकर नागरिकांना करत आहोत. तळेगावकर नागरिकांनी शक्य तेवढी मदत उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत करावी; असे आवाहन आवारे यांनी केले आहे.