पोलिसांना चकवा देत गजा मारणे कोर्टात हजर, जामीन मंजूर
पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीणचे स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस होते मागावर
पुणे : पोलिसांच्या अटकेच्या भीतीने कूविख्यात गजानन मारणे आज वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे. विशेष म्हणजे गजा मारणे कोर्टात आला आणि तो आरामात निघूनही गेला, तरी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांना कळाले नाही हे आश्चर्य आहे.
तळोजा ते पुणे जंगी मिरवणूक काढणाऱ्या गजानन मारणे व त्याच्या साथीदार आणि समर्थकांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला व इतर 9 जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.
यानंतर लागलीच पोलिसांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला. पण तोपर्यंत गजा मारणे फरार झाला. यात पोलिसांनी गजानन मारणे हा पोलिसांचे अटकेच्या कारवाईच्या भीतीपोटी फरार झाला, असल्याचे सांगितले. त्याच्या शोधासाठी पथके देखील रवाना केली. त्याचे फार्म हाऊस आणि कुटुंबाकडे चौकशी सुरू केली. पण आज गजा मारणे हा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. याप्रकरणी त्याला कोर्टाने जामीन दिला.. यानंतर तो निघून देखील गेला आहे.
संपुर्ण पोलीस दल त्याच्या मागावर आहे. दररोज त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस शोध घेत आहेत आणि असे असताना तो आज चक्क कोर्टात हजर झाला आणि जामीन मिळवून निघून देखील गेला. याची पोलिसांना कसलीच खबर लागली नाही त्यामुळे याची चर्चा जोरदार रंगली आहे.