पिंपरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सदस्य म्हणून नगरसदस्य तुषार रघुनाथ हिंगे यांची नियुक्ती आज महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य झालेल्या केशव घोळवे यांनी या समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने एक जागा रिकामी झाली होती. या रिकाम्या जागेवर ‘तुषार हिंगे’ यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल हिंगे यांचे महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांच्या हस्ते पुस्तक देऊन अभिनंदन करण्यात आले.
महापालिकेच्या पिंपरी मुख्य प्रशासकीय इमारतीमधील “यशवंतराव चव्हाण सभागृहात” झालेल्या सत्कारप्रसंगी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, नगरसचिव उल्हास जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.