मुंबई : संजय राऊत यांनी आता भाजप आणि शिंदे गटावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हिसकावण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपावर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, शिवसेना नाव आणि निशाणीसाठी रुपये 2000 कोटींचा सौदा झाला, असे संजय राऊत म्हणतात, मला आशा आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोर्टात याचीका करणार आहे, त्यात हा आरोप, माहितीचा उल्लेख करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या ट्वीटसोबत किरीट सोमय्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, संजय राऊत म्हणतात शिवसेना नाव आणि निशाणासाठी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाला. उद्धव ठाकरे आपण आणि संजय राऊत जे कोर्टात अपील करणार आहात, त्यात हा आरोप आपण करणार ना? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.