‘बँक ऑफ महाराष्ट्र’ बँकेवर भरदिवसा ‘सशस्त्र’ दरोडा; कोट्यावधीचं सोनं आणि रोकड लंपास

0

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर मध्ये मोठी घटना घडली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा टाकून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम नेले आहेत. ही घटना पिंपरखेड या गावामधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आज (गुरुवार) दुपारी दीडच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पुणे  जिल्ह्यात खळबळ उडाली.

दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत बँकेतून कोट्यावधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बँकेवर दरोडा पडल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांना महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. दरोडेखोर 25-30 वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

5-6 दरोडेखोर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट घातले होते. हे दरोडेखोर सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडीतून आले होते. या गाडीवर ‘प्रेस’ असे लिहिलेले होते. दरोडा टाकल्यानंतर आरोपी नगरच्या दिशेने पळून गेले आहेत.

शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे आणि इतर गावातील पोलीस पाटील यांना संदेश पाठवून हा संदेश गावातील इतर ग्रुपमध्ये व्हायरल करण्यास सांगितले आहे.
तसेच या वर्णनाची गाडी आणि संशयित मिळून आल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने ही गाडी व इसम पकडून ठेवावेत असे संदेशात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.