पुणे : पुण्यातील लष्कराच्या AFMC मध्ये असलेले ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी रेल्वेच्या समोर येऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. नाईक हे हेड ऑफ द डिपार्टमेंट हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन येथे ब्रिगेडियर म्हणून कार्यरत होते. ते भुवनेश्वर येथील रहिवासी आहेत . पुण्यातील एएफएमसी येथे कार्यरत होते.
दरम्यान, आज (रविवारी) सकाळी ते सरकारी गाडी घेऊन चालक बोडके यांना घेऊन पुणे रेल्वे स्थानक परिसरात आले होते. यावेळी त्यांनी चालक बोडके यांना एमसीओ मधून जाऊन येतो, असे सांगितले व त्यांना गाडीत थांबा असे म्हंटले. त्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या त्यांनी उद्यान एक्सप्रेस गाडीच्या इंजिनसमोर येऊन आत्महत्या केल्याचा केली. फलाट क्रमांक तीनवर हा प्रकार घडला आहे. माहिती मिळताच लोहमार्ग अधीक्षक सदानंद वायसे पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांची तपासणी केली. पण त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळाली नाही. यानंतर त्यांच्या मुलाला या घटनेची माहिती दिली. मुलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार एका पाणी सप्लाय करणाऱ्या व्यक्तीने पाहिला आहे. तर सीसीटीव्हीत ते फलाट क्रमांक एकवर फिरत असताना दिसत आहेत. तसेच त्यांनी चेन्नई एक्सप्रेससमोर देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे यातून दिसत असल्याचे अधीक्षक वायसे पाटील यांनी सांगितले आहे. आता त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिक तपास सुरू आहे.