पुणे: जमिनीच्या बदल्यात रक्कम देण्यास टाळाटाळ करीत खरेदी जमिनीतील २८ गुंठे जमीन दुस-याला विकल्याप्रकरणी एका आरोपीस हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीस दोन जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अमित देवराम कलाटे ( रा. वाकड चौक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आणखी एका आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कासारसाई येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०१८ ते मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी याने फिर्यादींची कासारसाई येथील जमीन त्यांच्याकडून एक कोटी १५ लाख रुपयांना विकत घेतली. त्यानंतर खरेदीखतामधील भरणा तपशीलाचे पान बदलून खरेदीखतामध्ये नोंद केले प्रमाणे इसार रक्कम व १५ धनादेश न देता दुस-या नावाने धनादेश दिले आणि जमीनविक्रीच्या मोबदल्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तसेच फिर्यादीच्या संमतीशिवाय जमिनीतील २८ गुंठे साठेखताने दुस-या व्यक्तीस विकली. व्यवहारात ठरलेली रक्कम मागण्यास फिर्यादी गेल्या असता त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
अटक केल्यानंतर कलाटे याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीवर यापूर्वी चेक बाउंसचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने विक्री केलेले २८ गुंठे जागेचे खरेदीखताच्या मुळप्रती आणि रक्कम जप्त करणे यासाठी त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी द्यावी, अशी असा युक्तिवाद सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केला.