पुणे: एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या वादातून मित्रांना बोलावून घेत शेजारी राहणा-यास लोखंडी पाईपने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-यास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे. आरोपींच्या मारहाणीत दोन हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला होता.
मारहाण केल्यानंतर आरोपी हा गेल्या सात महिन्यापासून आरोपी फरार होता. शिवम उर्फ शुभम राहुल शिंदे (वय २४, रा. बाजारे मळा, वडकीगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मलकेश उर्फ गणेश भिकाजी कांबळे (वय २६) आणि अविनाश भिकाजी कांबळे (वय ३२, दोघे रा. सिंहगड रस्ता) विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. निलेश सुरेश जोगदंड (वय ३२, रा. दांडेकर पूल) याने फिर्याद दिली आहे.
सिंहगड रस्ता परिसरात पंचतारा बिल्डिंग समोर सात ऑक्टोबर २०२० रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
फिर्यादी निलेश हे त्यांच्या घरासमोर आईसोबत बोलत उभे होते. यावेळी त्यांच्या शेजारील इमारतीमध्ये राहणारा शुभम शिंदे याने फिर्यादीजवळ येवून ‘माझ्याकडे काय बघतोस’ असे बोलून वाद घातला. तसेच अविनाश आणि गणेश कांबळेला बोलावून घेत लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यामध्ये निलेश याचे दोन्ही हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला.
अटक आरोपी शिवम शिंदे हा सरार्इत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात वारजे आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने जबर मारहाणीत फिर्यादी गंभिर जखमी झाले असून मोठी शारिरिक हानी झाली आहे. गुन्हा झाल्यापासून आरोपी फरार होता. गुन्ह्यांत वापरलेला लोखंडी पाईप जप्त करणे व तपासासाठी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.