कला दिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणात आणखी एक आरोपी अटकेत

0
पिंपरी :  प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सुरुवातीला बिझनेस पार्टनरला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी साप्ते यांना धमकवणाऱ्या देखील अटक केली आहे.
धर्मेंद्र श्यामसुंदर रावत (32, रा. शिवशक्ती मित्र मंडळ, नवीन आजाद नगर, महाकाली रोड, मुंबई) असे आता अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी साप्ते यांचा बिजनेस पार्टनर चंदन रामकृष्ण ठाकरे (36, रा. एकतानगर, कांदिवली वेस्ट, मुंबई) आणि धमकवणारा आरोपी राकेश सत्यनारायण मौर्य (47, रा. कांदिवली ईस्ट, मुंबई) या दोघांना अटक केली आहे. या आरोपींसह नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सोनाली राजेश साप्ते (45, रा. ताथवडे. सध्या रा. कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार तीन वर्षांपासून दोन जुलै 2021 या कालावधीत राजेश साप्ते यांच्या कांदिवली वेस्ट, मुंबई आणि ताथवडे, पुणे येथील घरी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश, गंगेश्वर, राकेश आणि अशोक यांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांचे पती राजेश साप्ते यांना जीवे मारण्याची तसेच लेबर लोकांना कामावर येऊ देणार नाही आणि व्यवसायिक नुकसान करण्याची धमकी दिली. वारंवार धमकी देऊन जबरदस्तीने दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक लाख रुपये पैशांची मागणी केली. आरोपींनी राजेश साप्ते यांना त्यापोटी अडीच लाख रुपये जबरदस्तीने देण्यास भाग पाडले.
दिग्दर्शक राजेश साप्ते यांचे बिझनेस पार्टनर आरोपी चंदन ठाकरे याने देखील वेळोवेळी विश्वासघात व फसवणूक करून त्यांचे आर्थिक नुकसान केले. आरोपींच्या छळाला कंटाळल्याने साप्ते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींनी राजेश यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत भारतीय दंड विधान कलम 120 ब, 384, 385, 386, 387, 306, 406, 420, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.