मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनिल पाटील हाच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर रविवारी खुद्द सुनिल पाटील यांनीच कंबोज यांचा दावा फेटाळून लावला आहे. पाटील हे रविवारी पहिल्यांदाचा माध्यमांसमोर आले. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सॅमने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन सुटका करून घेतल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
पाटील यांनी माध्यमांसमोर येत अनेक गोष्टींची पोलखोल केली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात डील झाल्याचेही त्यांनी सांगितले. सॅम डिसूझा, मनिष भानूशाली व किरण गोसावी यांच्यात डील झाले होते. मी 27 सप्टेंबर ते चार ऑक्टोबरपर्यंत अहमदाबादलाच होतो. त्यादिवशी मनिषने पहाटे अडीच वाजता याबाबत सांगितले. ते सर्वजण मुंबईत होते. सकाळी साडे आठ वाजता मला डील झाले असून 50 लाख टोकन दिल्याची माहिती त्याने दिली. पण त्यांची डील कधी झाली, काय झाले हे मला काहीच माहिती नाही.
सॅम डिसोझाबाबत गौप्यस्फोट करताना सुनिल पाटील यांनी एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सॅमशी माझा संबंध एक वर्षांपासून आहे. त्याला ड्रग्ज पार्टीची माहिती देण्याचा माझा एकच हेतू होता. त्याला चार महिन्यापूर्वी एका प्रकरणात एनसीबीने समन्स पाठवले होते. ते समन्स त्याने मलाही पाठवले होते. तो त्यावेळी स्टेटमेंट देऊनही आला होता. त्यानंतर मला पैशांसाठी फोन आला. एनसीबीला 25 लाख द्यायचे आहेत, असे सांगितले. पण माझ्याकडे एवढे पैसे नसल्याचे त्याला सांगितले. दुसऱ्यादिवशी त्याचा फोन आला. भाऊ तुम्ही पैसे नाही दिले तर माझे काम होणार नाही का? मी एनसीबीवाल्यांना पैसे दिले आणि सुटलो, असं सॅमने सांगितल्याचा दावा पाटील म्हणाले. हीच आठवण होती म्हणून मी धवल भानूसाली व नीरज यादवला सॅमची माहिती दिल्याचा दावाही पाटील यांनी केला.
ड्रग्ज पार्टीची टीप मला मिळाली नव्हती. ही टीप मनिष भानूसालीकडे होती. त्याच्याआधी दुपारी चार वाजता त्याचा मित्र धवल भानूशाली व नीरज यादवने मला फोन केला. रेडबाबत त्यांनी सांगितले होते. त्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांना ही माहिती द्यायची होती. सॅमचा एनसीबीशी संबंध आला होता. म्हणून मी त्यांना सॅमची माहिती दिल्याचे पाटील यांनी सांगितलं.
या प्रकरणाचा मास्टरमाईंड कुणी वेगळंच आहे. मनिष भानुशालीशी माझा संबंध मित्र म्हणून गेल्या दहा-बारा वर्षांपासून आहे. एका टेंडरसंबंधात मी मनिषसोबत अहमदाबादला गेलो होतो. त्याचे गुजरातच्या मंत्र्यांशी संबंध आहेत. किरण गोसावीला मी चार सप्टेंबरपासून ओळखतो. घटना घडण्याच्या काही दिवस आधी ही ओळख झाली. 22 सप्टेंबरला आम्ही भेटलो. तिथून आम्ही परत आलो, असे पाटील म्हणाले.