मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी यासंबंधीचा तपास अहवाल सादर केल्यानंतर एनसीबीनं ही कारवाई केली आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.
आशिष रंजन प्रसाद आणि व्ही. व्ही. सिंग अशी निलंबन करण्यात आलेल्या दोन एनसीबीच्या अधिकाऱ्यांची नावे आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपास पथकात या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीवर आरोप होत असताना या प्रकरणी बऱ्याच तक्रारी ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे आल्या होत्या. एनसीबी चुका करत आहे, बऱ्याच गुन्ह्यांमध्ये एनसीबीकडून योग्य तपास होत नाही, असे आरोप नवाब मलिक यांनी केले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे जो अहवाल आला होता यामध्ये या दोन अधिकाऱ्यांची नावं होती. या अहवालाच्या आधारेच या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु कोणत्या आरोपांमुळे त्यांच्यावर कारवाई केली आहे, हे अद्याप समजू शकले नाही.