पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरासह, पुणे शहर, पुणे ग्रामिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 200 दुचाकी चोरणारे चोरटे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाच्या जाऴ्यात सापडला आहे. या चोरट्याकडुन पथकाने 51 दुचाकी, 01 अँटो रिक्षा आणि 01 मोबाईल फोन असा 36 लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शंकर भीमराव जगले ( 22 वर्ष, रा. पिंपरी) आणि 2) संतोष शिवराम घारे (38 वर्ष, रा. ओझर्डे, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक केलेल्या सराईत वाहन चोरट्यांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, दरोडा, वाहन चोरी, घरफोडी या गुन्ह्यांस प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकिस आणण्यासाठी सर्वांना सुचना दिलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकातील पोलीस उप-निरीक्षक मंगेश भांगे व पोलीस अंमलदार खांडे, लोखंडे, कोकणे, शेडगे, बनकर, कोशल असे पथक (ता. 26) ऑक्टोंबर रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील टॉप 25 पाहिजे/फरारी आरोपी बाबत माहिती काढून शोध घेणे बाबत दिलेल्या आदेशान्वये, माहिती घेत असताना दोन संशयित इसम हे वारंवार वाहनचोरी करीत असल्याचे निदर्शनास आले.
आरोपींना शोधण्यासाठी पथकाने सतत दोन महिने 500 हुन अधिक सी. सी. टी. व्ही फुटेज तपासले. फुटेज मध्ये दिसणाऱ्या इसमाबाबत माहिती घेत असताना पोलीस उप-निरीक्षक मंगेश भांगे यांना माहिती मिळाली की, पवना हॉस्पिटल, तळेगाव येथे दोन संशयित इसम येणार आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी हॉस्पिटल परीसरात सापळा लावला. परंतु त्या इसमांना पोलीसांची चाहूल लागल्याने ते पळून जावु लागले. पथकातील पोलीस कर्मचारी यांनी दोन किलोमीटर त्या इसमांचा पाठलाग करुन उर्से गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ताब्यात घेतले.
पथकाने त्या दोन इसमांची नावे विचारुन त्यांच्या सखोल चौकशी केली असता ते दोघे अट्टल दुचाकी चोरटे असल्याची माहिती पथकाला मिळाली, त्यांच्याकडुन एकूण 36 लाख रुपये किंमतीच्या चोरीच्या 51 दुचाकी गाड्या जप्त करून पिंपरी चिंचवड शहरासह, पुणे शहर, पुणे ग्रामिण पोलीस ठाण्यातील 35 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत . उर्वरित 14 दुचाकी वाहनाचे मालकांचा शोध पोलीस करीत आहेत.
दरोडा विरोधी पथकाने चालु वर्षात चोरीची 101 दुचाकी व चारचाकी वाहने हस्तगत केली आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार महेश खांडे, विक्रांत गायकवाड, उमेश पुलगंम, राहुल खार्गे, राजेंद्र शिंदे, पोलीस नाईक नितीन लोखंडे, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कोशल ,आशिष बनकर, गणेश सावंत, विनोद वीर, समीर रासकर, अमर कदम, प्रवीण कांबळे, औंदुंबर रोंगे, गोविंद सुपे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.