बंगळुरू : अनलॉकनंतर भारतीय आयटी कंपन्यांनी 2021-22 साठी मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि विप्रो या चार प्रमुख आयटी कंपन्या एकत्रितपणे कॅम्पसमधून तब्बल 91 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहेत.
टीसीएसने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा यावर्षीप्रमाणेच पुढील वर्षासाठी तब्बल 40 हजार फ्रेशर्सना हायर करण्याचा मानस आहे. इन्फोसिसने असे म्हटले आहे की, येत्या आर्थिक वर्षात ते 24,000 पदवीधरांची नेमणूक करतील. चालू वर्षात त्यांची 1 हजार जणांना निवडण्याची योजना आहे.
एचसीएल टेक्नॉलॉजीजचे मुख्य मानव संसाधन अधिकारी अप्पाराव व्हीव्ही म्हणाले की, भरतीने मोठा वेग घेण्याची अनेक कारण आहेत. आम्ही आमच्या लक्ष्यापेक्षा 33 टक्के अधिक मिळवले आहे. याशिवाय तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत वाढीची अपेक्षा आहे.
भारतातील बड्या आयटी कंपन्यांनी विविध परदेशी संस्थांशी केलेल्या कराराचा परिणाम म्हणूनही मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार आहे. इन्फोसिसने आपल्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी डील जर्मन ऑटोमोटिव्ह मेजर डेमलरकडून मिळवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.