पक्ष चिन्हं अन नाव मिळताच शिंदे गटानं ठोकला विधिमंडळावर दावा

0

मुंबई: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे राहील असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठवले. पण न्यायालयाने उद्या येण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला “शिवसेना” आणि “धनुष्यबाण” हे चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे गटाचे वकिल सुप्रीम कोर्टात पोहचले. मात्र, कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत उद्या येण्याचे निर्देश दिले.

यानंतर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सर्वोच्च संस्थेकडून नीट विचार न करता विश्लेषण न करता निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. तर शिंदे गट शिवसेनेच्या वस्तूवर दावा करू शकत नाही. विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयावर कोणी दावा सांगू शकत नाही आम्ही अध्यक्षांकडे जाऊ आणि नियमानुसार प्रक्रिया पार पडेल असं ते म्हणाले आहेत. तर निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला असल्याचेही देसाई यांनी म्हंटलं आहे.

त्याचबरोबर कार्यालय ताब्यात घेण्यावर देसाई म्हणाले की, शिवसेना भवन किंवा कोणत्याही वास्तूवर ते दावा सांगू शकत नाहीत. निवडणूक आयोग चिन्हं आणि नावावर निर्णय देऊ शकतं. नाव आणि चिन्हं कोणाला द्यायचं याचा अधिकार आयोगाला आहे आणि त्यांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी ते गोठवू पाहत आहेत त्या चुकीच्या असल्याचं देसाई यांनी म्हंटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.