महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचे गायी, हिंदुत्वाचा डोस : उद्धव ठाकरे
गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही
मुंबई : महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचे गायी, हिंदुत्वाचा डोस सुरू आहे. सध्या देश हुकूमशाहीकडे चालला आहे, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ते शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलत होते. गृहमंत्री अमित शहा हे प्रत्येक राज्यात जातात. काड्या करतात आणि सरकार पाडतात. मात्र, तुम्ही साथ द्या. तुम्हाला पुन्हा सरकार आणून दाखवेन, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
एकाअर्थी झाले, ते बरे झाले. फक्त तुम्ही साथ द्या. पुन्हा सरकार आणून दाखवतो. बरे झाले. बांडगुळे गेले. ती बांडगुळ सेना म्हणा, असे कोणी तरी मला म्हणाले. मात्र, तो बांडगुळ गट आहे. माझ्या मनात विश्वास आहे. ज्या महिषासूर मर्दीनीने महिषासूर मारला. ती महिषासूर मर्दीनी हा खोकासूर मारेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरेंच्या भाषणानंतर शिवाजी पार्कवर रावण दहन करण्यात आले.
भाजपचे स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवावे. तुम्ही आमच्या पत्रकार परिषद ऐकल्या. आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदा घ्यायचो. कधीही अजित पवारांनी माझ्यासमोरचा माइक ओढला नाही. आम्ही सोबत असताना भाजपने औरंगाबादचे संभाजीनगर केले नाही. उस्मानाबादचे धाराशिव केले नाही. मात्र, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असताना ते करून दाखवले.
बिलकिस बानोवर बलात्कार झाला. तिच्या मुलीचा आपटून खून केला. आरोपी पकडले. शिक्षा भोगत होते. त्यांना गुजरात सरकारने सोडून दिले. मात्र, गावी गेल्यानंतर त्यांचा सत्कार करून स्वागत केले. जी शिकवण शिवरायांनी दिली. कल्याणच्या सुभेदाराची खणानारळाने ओटी भरणारे शिवराय. हे शिकवण देणारे आमचे हिंदुत्व आहे.
देशातील लोकशाही राहते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. सगळे पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकूमशाहीकडे चालला आहे. ही गुलामगिरी तुम्हाला चालणार आहे का?
काश्मीरमधलीच ती एक घटना आहे. औरंगजेब नावाचा लष्करात एक गनमॅन होता. त्याचे अपहरण करण्यात आले. काही दिवसांनी त्याचे प्रेत आपल्या सैन्याला मिळाले. त्याला हालहाल करून मारले. मुसलमान अतिरेक्यांनी त्याला मारले. तो भारताच्या बाजूने लढतोय म्हणून त्याला मारले. तो औरंगजेब आमचा भाऊ आहे. हे आमचे हिंदुत्व आहे.
हिंदुत्व म्हणजे नेमके काय. तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी एकाच व्यासपीठावर यावे आणि सांगावे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आमचे हिंदुत्व जानवे आणि शेंडीशी निगडीत नाही. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले. या देशावर प्रेम करणारा मुसलमान असला, तरी तो आमचा. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. घराबाहेर पडल्यानंतर देश हाच धर्म म्हणावा. मात्र, बाहेर येऊन कुणी मस्ती दाखवत असेल, तर आम्ही खरे हिंदुत्व दाखवू.
पाकिस्तासमोर, चीनसमोर जाऊन शेपट्या घालायच्या. इकडे येऊन पंजा दाखवायचा ही तुमची मर्दुमकी. इकडे येऊन प्रकल्प पळवतायत. आम्हाला गुजराबद्दल आसूया नाही. मात्र, मोठमोठे प्रकल्प गुजरातमध्ये नेणे ही कितपद योग्य.
अमित शहाजी आम्हाला जमीन दाखवाच. पाकिस्तानने बळकावलेली आमची जमीन एक इंच आणून दाखवा. मोदींच्या त्या मुलाखती आम्ही आजही ऐकतो. पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ. मात्र, पाकव्याप्त काश्मीरची एक इंचही जमीन तुम्ही घेऊ शकला नाहीत.
हिंदुत्व हिंदुत्व करत गायी वरती बोलताय ना. मग महागाईवर बोला. ही गायी आठवू द्यायची नाही म्हणून हिंदुत्वाचा डोस. खरे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे यांनी महागाईची आठवण करून दिली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
हिंदुत्व भाजपने शिकवायची गरज नाही. अरे पाकिस्तानात जावून जिनाच्या थडग्यावर डोके टेकवणारी तुमच्या पक्षाची औलाद. पाकिस्तानात जावून तिथल्या पंतप्रधानांच्या वाढदिवासाच केक खाणारा तुमचा नेता. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार.
माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन, शिवरायांच्या साक्षीने मी सांगतो. माझ्यात आणि अमित शहांमध्ये अडीच-अडीच वर्षे सत्तावाटपाचे ठरले होते. मात्र, त्यांना शिवसेना संपवायची आहे. एवढ्यावरच नाही. माणसाची हाव किती असते. तिकीट दिला. उपमुख्यमंत्री केला. आता मुख्यमंत्री केला. त्याला आता शिवसेनाप्रमुख व्हायचेय. ही बाप चोरणारी औलाद. ना स्वतःचे विचार.
आनंद दिघे आज आठवतायत. मात्र, ते आपल्यात नाहीत. ते बोलू शकणार नाहीत. दिघे एकनिष्ठ होते. ते शेवटी सुद्धा भगव्यात गेले. यावर्षी रावण दहन होणारच, पण तो दहा डोक्यांचा नाही. तर एक्कावन खोक्यांचा बकासूर, धोकासूर आहे. मी आजारी असताना जबादारी सोपलेल्या कटप्पाने धोका दिला. होय गद्दाराच, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत. पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही.
शिवाजी पार्कवरले प्रेम ओरबाडून घेता येणार नाही. हे माझ्या शिवसैनिकांचे प्रेम आहे. मला अजूनही डॉक्टरांनी वाकण्याची परवानगी दिली नाही. मात्र, तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जावूच शकत नाही.