अश्विनी जगताप सोमवारी अर्ज भरणार; भाजपची जोरदार शक्तीप्रदर्शनची तयारी

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा सोमवारी (दि. ६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि राज्यातील नेत्यांनी दोन दिवसांपासून विविध पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पिंपळेगुरव ते थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे. ही पदयात्रा लक्षवेधी ठरावी यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती चिंचवड विधानसभेचे निवडणूक व प्रचारप्रमुख शंकर जगताप यांनी दिली.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ९ वाजता पदयात्रेला सुरूवात होणार आहे. गावातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सृष्टी चौक, सुदर्शननगर, जवळकरनगर, कल्पतरू फेज १, सुदर्शन चौक, स्वराज गार्डनमार्गे पिंपळेसौदागर गावठाण पुढे शंकर मंदिर, रहाटणी चौक, विमल गार्डन, बळीराज गार्डन, कुणाल गार्डन, बापुजी बुवा मंदिर, थेरगाव हॉस्पिटलमार्गे ग प्रभाग कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ग प्रभाग कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे चिंचवड विधानसभा निवडणूक व प्रचारप्रमुख शंकर जगताप यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.