पिंपरी : चिंचवड मतदार संघात पोटनिवडणूक लागली असून तिरंगी लढत होत आहे. समोर कोण उमेदवार लढत आहे याकडे आम्ही पाहत नाही. आम्ही सर्व मतदारासमोर जात आहोत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेला विकास आणि त्यांचे धोरण पाहता निवडणुकीत विजय हा नक्की आहे. केंद्र आणि राज्यात असणारे सरकार, विकास आणि सर्व समघटनांचा पाठिंबा यामुळे अडचण येणार नाही. अशवजनी6 जगताप या 51% मताधिक्याने निवडणूक येतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे व्यक्त केला.
चिंचवडचे आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी शहरात विकासाची साखळी तयार केली. त्यांच्या विकासाची कडी पुन्हा एकदा अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवडची जनता जोडणार आहे. निवडून आल्यानंतर अश्विनी जगताप या स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांना अपेक्षित असलेल्या विकासाचे स्वप्न पूर्ण करतील. तसेच केंद्र व राज्याच्या योजना जास्तीत जास्त पिंपरी-चिंचवडच्या जनतेपर्यंत पोहोचवतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी व्यक्त केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रचार दौरा केला. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, सचिन पटवर्धन, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश सचिव अमित गोरखे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “चिंचवड मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी गरीब घटकांसाठीच्या केंद्र व राज्याच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आनंद दिला. त्यांनी केंद्र व राज्याच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये काम उभे केले. त्यामुळे पोटनिवडणुकीत जनतेने त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करण्याचे मन तयार केले आहे. स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी तयार केलेली विकासाची कडी पुन्हा एकदा अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून जनता जोडणार आहे. आपल्या पतीच्या विकासाचा संकल्प समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती उभा करण्यासाठी अश्विनी लक्ष्मण जगताप काम करतील.
स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात विकासाचे मॉडेल उभे केले. आमदारकीसाठी खूप कमी काळ शिल्लक असताना त्यांचे निधन झाले. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने महाविकास आघाडी व राज ठाकरे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांना विनंती केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी निवडणूक लढवू नये अशी सूचना केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसे आवाहन केले होते. शरद पवार यांच्या विधानानंतर भाजपला वाटले की, आमदारकीचा खूप कमी काळ असल्याने अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लढवू नये. त्यानुसार भाजपने त्यावेळी पोटनिवडणूक लढवली नाही. पण हाच निकष महाविकास आघाडीने चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मान्य केले नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपची विनंती मान्य केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.”