पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांवर विरोधी पक्षाने शंका उपस्थित केली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणात पुढे काय झाले, असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर न देता सुरू पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून जाणे पसंद केले.
राज्यातील राजकारण ढवळून काढणाऱ्या पूजा चव्हाण या 22 वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिला. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात सोमवारी पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्रकारांनी या तपासा बाबत प्रश्न विचारला. मात्र, प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पोलीस आयुक्त गुप्ता आपल्या खुर्चीवरुन उठून हॉलबाहेर गेले.
पूजा चव्हाण प्रकरणी संशयित मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?, पोस्ट मार्टम अहवाल नेमका काय आले आहे ?, यासारखे प्रश्न पत्रकारांनी पोलीस आयुक्त गुप्ता यांना विचारले. मात्र, या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी गुप्ता हे हसतच आपल्या जागेवरुन उठले आणि हॉलबाहेर पडले.
पूजा चव्हाण तपासासंदर्भातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता पुण्याचे पोलीस आयुक्त पत्रकार परिषद सोडून निघून गेले. पत्रकार त्यांना काहीतरी माहिती द्या, अशी विनंती करत असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करत गुप्ता यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेल्या हॉलमधून काढता पाय घेतला.