पिंपरी : मित्रानेच हत्याराने वार करुन खून केल्याची घटना मुळशी तालुक्यातील नेरेदत्तवाडी येथे घडली आहे.
गणेश रामदास पिंजण (35, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी दिनेश रामदास पिंजण (33, रा. नेरेदत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ शेडगे, ऋषिकेश भिंताडे (दोघे रा. कासारसाई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश आणि आरोपी शेडगे व भिंताडे हे मित्र होते. आरोपींनी गणेश यांना अज्ञात कारणावरून हत्याराने कपाळावर, हातावर व छातीवर मारहाण केली. त्यात गंभीर जखमी होऊन गणेश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह नेरेदत्तवाडी येथील मोकळ्या प्लाॅटमध्ये फेकून दिला. हा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.