नवी मुंबई : भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तुर्भे येथे उभारले आहे. पेट्रोल,डिझेल या इंधनाला इलेक्ट्रिक वाहन हे उत्तम पर्याय असून, भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे उद्योग आणि खनिकर्म, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
मॅजेन्टा ग्रुपमार्फत भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तुर्भे येथे उभारण्यात आलेय. या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले, त्यावेळी सुभाष देसाई बोलत होते. यावेळी मॅजेन्टा ग्रुपचे व्यवस्थापक संचालक मॅक्सन लुईस तसेच मॅजेन्टा ग्रुपचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक असून, त्या वाहनाचा देखभालीचा खर्चसुद्धा कमी असल्याने भविष्यामध्ये पर्यावरणपूरक वाहनाची संख्या वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तुर्भे येथील चार्जिंग स्टेशन 24 तास कार्यरत असून, दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी 21 एसी/डीसी चार्जर उपलब्ध असणार आहेत.
या ठिकाणी 45 मिनिटांमध्ये वाहन चार्जिंग होणार असून, ज्या वाहनाना एसी स्लो चार्जिंग आवश्यक आहे, अशा वाहनांसाठी वेगळी मार्गिका विकसित करण्यात आलीय. हे सर्व चार्जर्स ऑनलाईन रिमोटद्वारे नियंत्रित, चार्जग्रीन ॲपद्वारे अपडेट केले असल्याने पूर्णपणे सुरक्षित असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
दुसरीकडे सिडकोकडून ऐरोली येथील सेक्टर-13 मधील भूखंड क्र. 6 अ हा अंदाजे 3000 चौ. मी.चा भूखंड मराठी भाषा भवन उपकेंद्राकरिता निश्चित करण्यात येऊन दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने या भूखंडाचा ताबा राज्य शासनाला देण्यात आलाय. त्याचप्रमाणे इमारतीची उभारणी करण्याची जबाबदारी शासनातर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास देण्यात आली आहे, अशी माहिती सुभाष देसाई, मंत्री, मराठी भाषा विभाग यांनी दिली.