कीटक भालेराव, रामा पाटील टोळ्यांवर मोका

0

पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि रावेत परिसरातील रामा पाटील टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 (मोका) नुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि त्याच्या पाच साथीदारांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, दुखापत, विनयभंग, खंडणी मागणे, बेकायदेशीर हत्यार तसेच अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, तोडफोड करणे असे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख जय उर्फ कीटक प्रवीण भालेराव (वय 19, रा. म्हाडा कॉलनी, तळेगाव दाभाडे), टोळीतील सदस्य ऋतिक उर्फ दाद्या पोपट मेटकरी (वय 22, रा. देहूरोड), विशाल शिवाजी गुंजाळ (वय 18, रा. तळेगाव दाभाडे), प्रदीप ज्ञानोबा वाघमारे (वय 22, रा. वडगाव मावळ), वैभव रामकृष्ण विटे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

रावेत परिसरातील रामा पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांवर गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, कट रचणे, बेकायदेशीर जमाव जमवून सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे, चोरी करणे, चोरीचा माल घेणे असे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख रामा परशुराम पाटील (वय 29, रा. थेरगाव), टोळीतील सदस्य प्रदीप उर्फ पांडुरंग लहू सुतार (वय 32, रा. रहाटणी), नीरज रवींद्र आडाणे (वय 28, रा. मुदखेड, नांदेड) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

वरील दोन्ही टोळ्यांनी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सत्यवान माने, शिवाजी गवारे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, अमित गायकवाड, विकास तारू यांनी केली.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत 18 टोळ्यांमधील 196 आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मोका) अन्वये कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.