बीएमसी मधील घोटाळा बाहेर काढल्याने माझ्यावर हल्ला : संदीप देशपांडे

0

 

मुंबई : मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळा बाहेर काढल्यामुळे माझ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामागील सुत्रधार मला माहिती आहे. मात्र, आता हल्ल्याबाबत पोलिस तपास सुरू असल्यामुळे यावर अधिक भाष्य करणार नाही, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तर, ठाकरे गटाच्या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रसिद्धी, सुरक्षा मिळवण्यासाठी असे आरोप केले जातात, असा टोला संदीप देशपांडेंना लगावला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, माझ्यावर हल्ला कुणी केला?, हे मला माहिती आहे. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून सगळे बाहेर येईलच. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली जे येतात, त्यांचे कोच कोण आहेत, याचा शोध पोलिस नक्कीच घेतील. मात्र, हल्ल्यामागचा सुत्रधार कोण?, हे मला माहिती असले तरी आताच यावर बोलणे उचित ठरणार नाही.

संदीप देशपांडे म्हणाले, हल्ला झाल्यानंतर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक चौकशी केली. तसेच, सुरक्षेसाठी दोन पोलिस कर्मचारीही पाठवले. मात्र, माझी सरकारला नम्रविनंती आहे की, आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही. त्यामुळे आम्हाला सुरक्षेची गरज नाही. सुरक्षा द्यायचीच असेल तर ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, त्यांना सरकारने आता सुरक्षा पुरवावी, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

संदीप देशपांडे म्हणाले, मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेला भ्रष्टाचार मी उघड करणार असल्याची कुणकुण कदाचित लागली असेल. ही विरप्पन गँग कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. कोविड सेंटर्सना गाद्या पुरवण्याचे काम दोन फर्म्सना देण्यात आले होते. कोविडपुर्वी यांचा टर्न ओव्हर केवळ 10 लाख रुपये होता. नंतर त्यांचा टर्न ओव्हर कोटींपर्यंत गेला. या फर्म्स देडिया या माणसाच्या आहेत. त्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेत त्यांना या घोटाळ्याची कागदपत्रे मी सोपवली होती. त्यानंतरच माझ्यावर हल्ला झाला. हा घटनाक्रम तुम्ही समजून घ्या, असे सूचक वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केले.

तसेच, माझ्यावर कितीही हल्ले केले तरी कोविड काळातील मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार मी समोर आणतच राहील. कोविड काळातील संपूर्ण भ्रष्टाचार मी समोर आणणार, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणावर ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले, संदीप देशपांडेंसारख्या चिल्लर लोकांवर बोलणार नाही. ते काहीही बोलले की त्यावर प्रतिक्रिया देणे आम्हाला गरजेचे वाटत नाही. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी, सुरक्षा मिळवण्यासाठी, असे आरोप केले जातात. त्याकडे फारसे महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.