ठाणे : कळवा खारीगाव येथील पत्रकार, मानवी अन्याय निर्मुलन संघटना व भ्रष्टाचार निर्मुलन परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत म्हात्रे यांच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तीनी हल्ला केला.प्रशांत म्हात्रे हे कामानिमित्त कार्यालयाबाहेर गेल्यामुळे ते सुदैवाने बचावले आहेत.
कळवा खारीगाव परिसरात अनेक खाजगी जागेवर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत या विरोधात लढा देत असताना तसेच या कामी शासनाची चाललेली दिशाभूल निदर्शनास आणून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला होणे दुर्दैवाची बाब असल्याचे नागरिक बोलताना दिसत आहेत.
खारीगाव येथे खाजगी जागेवर स्वर्गीय सरस्वती आत्माराम म्हात्रे यांचा देखील हिस्सा आहे असे फेरफार नोंदीवरून दिसून येत आहे. सरस्वती म्हात्रे यांचे तीन वारसदार असताना त्यांची कोणतीही कागदोपत्री सहमती न घेता विकासकाने बांधकाम सुरू केली आहेत.या अनधिकृत बांधकाम विरोधात प्रशांत म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार व नगररचना अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केलेली आहे,मात्र अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही उलट त्या विकासकांना पाठीशी घालण्याचं काम ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी केले आहे असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.
प्रशांत म्हात्रे यांनी केलेल्या कारवाईच्या मागणीचा राग मनात धरून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकाने त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला असावा असा दाट संशय व्यक्त होत आहे.हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात प्रशांत म्हात्रे यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद करून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.