पिंपरी : वाकड येथील अष्टविनायक कॉलनीतील एटीएम फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न एका अल्पवयीन मुलाने केला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. हा प्रकार सोमवारी (दि. 8) पहाटे घडला.
गुन्हे शाखा युनिट चारचे सहाय्यक पोलीस फौजदार धर्मराज आवटे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस गस्त घालत होते. सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास अष्टविनायक कॉलनी येथील पंडित पेट्रोलपंपासमोर असलेल्या हिताची बँकेच्या एटीएम मध्ये रोकड पळवण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली.
पोलिसांनी एटीएम सेंटरकडे धाव घेतली असता एक अल्पवयीन मुलगा एटीएमच्या बाहेरील बाजूचा पत्रा उचकटून आतील पैशांचे ट्रे उचकटण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याचा एटीएम मधील रोकड पळवण्याचा डाव उधळून लावला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.