पुणे : कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवेली पोलिसानी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मंगळवारी (ता. २९) दिला आहे.
अभिषेक गंगणे (वय १९) आणि श्रेयश मते (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपेश पासलकर (वय २१) यांनी फिर्याद दिली आहे. २७ जून रोजी रात्री साडेआठ वाजता हवेली तालुक्यातील नांदेड गावच्या हद्दीत ही घटना घडली.
पासलकर हे त्यांच्या मित्रासह गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्या ठिकाणी येऊन त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गंगणे आणि मते यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्हा करण्यामागचा त्यांचा हेतू काय होता?, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी, त्यांचा आणखी कोणी साथीदार होता का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलानी केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.