पुणे : आपल्यावर पोलीस खोटा गुन्हा दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत एकाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
नवनाथ थोरात असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार मारूती शिंदे यांनी चतृःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नवनाथविरूद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात नवनाथ काल दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेला होता. त्यावेळी त्याने माझ्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याठिकाणी खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ नवनाथला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार करत आहेत.