पिंपरी : एटीएम फोडून पैसे मिळवू, त्यातून पिस्तूल खरेदी करू आणि आपल्यासोबत भांडण करणाऱ्या तरुणाचा गेम वाजवू, असा तरुणाने प्लॅन केला. त्यानुसार त्याने नवी सांगवी येथील अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला एटीएम पूर्णपणे फोडता आले नाही. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने या तरुणाला अटक केली आहे.
विशाल दत्तू कांबळे (24, रा. संगमनगर, नॅशनल स्कूल गेट नंबर 20, रेल्वे लेन, जुनी सांगवी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 16) मध्यरात्री एक वाजता एका चोरट्याने जुनी सांगवी येथील अॅक्सीस बँकेचे एटीएमची तोडफोड करून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दरोडा विरोधी पथकाने घटना घडलेल्या परिसरातील 80 ते 90 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून पोलिसांनी एका संशयित तरुणाची माहिती काढली. एटीएम मधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने घातलेला शर्ट आणि सॅंडल वरून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी संगमनगर, गेट नंबर 20, जुनी सांगवी या परिसरातील असावा अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा तापसचक्रे फिरवली.
पोलीस नाईक राजेश कौशल्ये यांना सोमवारी रात्री साडेआठ वाजता एक संशयित तरुण आढळला. तो इसम मोटार सायकल वरून आहिल्यादेवी चौकाकडून साई चौकाकडे जात होता. पोलिसांनी त्याचा काही अंतर नकळत पाठलाग केला. एका हॉटेल जवळ तो थांबला असता त्यास पोलीस नाईक राजेश कौशल्ये यांनी दारू कोठे मिळेल असे विचारले. त्याने जवळच्या परिसरात दारू मिळेल असे सांगितले. तेंव्हा त्यास दारू पिण्यास सोबत जाऊ असे म्हणून विश्वासात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली.
त्याला मागील आठवड्यामध्ये सांगवी परिसरामध्ये ऐकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून एका मुलाने मारहाण केली होती. त्याचा राग त्याच्या मनामध्ये असल्याने त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने मारहाण केलेल्या मुलाचा गेम वाजविण्यासाठी पिस्तुलची आवश्यकता होती. पिस्तुल आणण्यासाठी एटीएम फोडून पैसे मिळतील व त्या पैशातून पिस्तुल खरेदी करून मारहाण करणाऱ्या मुलाला काही अंतरावरून गोळी मारायची होती, असा त्याचा प्लॅन होता. म्हणून त्याने एटीएम फोडले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.