सत्ताधाऱ्यांकडून समाजात दंगली घडविण्याचे प्रयत्न : अनिल देशमुख

0

मुंबई : राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विदर्भातील अकोल्यापासून सुरू झालेले दंगलीचे लोण आता कोल्हापूरपर्यंत जाऊन पोहोचले आहे. कधी कधी तर असे वाटते की सरकारलाच दंगली घडवायच्या आहेत की काय, असा हल्लाबोल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. नागपुरातील निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना देशमुख यांनी दंगलींबद्दल चिंता व्यक्त केली.

समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. अनेकदा कानावर येते निवडणुकीपूर्वी दंगली घडवून आणायच्या, लोकांच्या भावना भडकवायच्या आणि त्याचा फायदा घ्यायचा, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. जनतेने असे प्रयत्न हाणून पडावे, सत्ताधाऱ्यांच्या या डावाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सभ्य, सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते आहेत. काय टिका करायची ती त्यांनी करायला पाहिजे. पण शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा एकेरी उल्लेख करणे त्यांना शोभले नाही. देशातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये शरद पवारांचा क्रमांक वरचा आहे. मुनगंटीवारांसारख्या नेत्यांनी तरी असे करू नये, असे अनिल देशमुख म्हणाले.

कृपाल तुमाने यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यांनी अजित पवार यांचे आव्हान स्वीकारावे. ‘50 खोके एकदम ओक्के’ हा गद्दारांचा विषय इतका लोकप्रिय झाला, की लहान मुलांनाही तो माहिती झाला आहे. तुमानेंनी आपले आरोप सिद्ध करावे, असे आव्हान त्यांनी खासदार तुमानेंना दिले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना देशमुख म्हणाले, 40 आमदारांना सांभाळण्याचे काम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करीत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही हे सांगता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.