ललित कुमार भालचंद्र भावसार (५५) असे लाचखोर लेखापरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील सहकारी संस्थेत काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, लाचखोर लोकसेवक ललित कुमार भावसार हा पुण्यातील सहकारी संस्थेत विशेष लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर या प्रकरणातील तक्रारदार हे वकील आहेत.
ऑडिटर पॅनल मधून मतदाराचे नाव न वगळण्यासाठी भावसार यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती दिली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
तडजोडी अंती तीस हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळी लाचेची रक्कम स्वीकारताना ललित कुमार भावसार यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.