प्राधिकरणाचा अविकसित भागही महानगरपालिकेत वर्ग करण्याची मागणी

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) विकसित असलेला भाग हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर अविकसित असलेला भाग हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. शहराचे नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी तसेच उद्भवनाऱ्या अडचणी वेळीच दुर करण्यासाठी विकसित भागाबरोबर अविकसित असलेला भागही महानगरपालिकेमध्ये वर्ग करणेत यावा अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये अगोदरच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ (एमआयडीसी) या तीन संस्था कार्यरत आहेत. सद्यस्थितीत या संस्थामार्फत शहरामध्ये रस्ते विकसन, निवासी, बिगरनिवासी व औद्योगिक इमारतींना बांधकाम परवानगी देणे, पाणीपुरवठा करणे व शहराचा मुलभूत विकास करणे, इ. विकासकामे केली जातात. या तीन वेगवेगळ्या संस्थाचे शहराच्या विकासकामावर वेगवेगळे नियंत्रण असल्याने विकास कामांबाबत कोणताही निर्णय घेत असताना वेळोवेळी अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत असतात.

आता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा अविकसित असलेला भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडे विकसनासाठी दिल्यास शहराच्या विकास कामांमध्ये आणखी चौथी संस्था निर्माण होईल व त्यामुळे अडचणीमध्ये आणखी भर पडु शकते. म्हणून शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या व औद्योगीकरण याचा विचार करुन शहराचे सुयोग्य नियोजन होण्यासाठी व विकास कामात उद्भवनाऱ्या अडचणी वेळीच दुर करण्यासाठी प्राधिकरणाच्या विकसित भागाबरोबर अविकसित असलेला भागही महानगरपालिकेमध्ये वर्ग करणेत यावा अशी मागणी मुख्यमंत्री यांचेकडे पत्राद्वारे करणेत आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.