अयोध्या दौरा : वचनपूर्ती हेच आमचे हिंदुत्व – आदित्य ठाकरे

0

मुंबई : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांनी अखेर बुधवारी अयोध्येत जाऊन श्री रामाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांच्या समवेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, राजन विचारे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांसह सेनेचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या दौऱ्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आदित्य ठाकरे इथे फार कमी वेळ होते. पण त्यात ते छाप पाडून गेले,’ असे त्यांनी म्हटले आहे.

अयोध्या दौऱ्यात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2018 मध्ये अयोध्येत ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा केली होती. आजही मी श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ही राजकीय यात्रा नाही तर तीर्थ यात्रा आहे. वचनपूर्ती हेच आमचे हिंदुत्व आहे आणि भक्ती हीच शक्ती,’ असे ते म्हणाले.

त्यानंतर आता या दौऱ्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अयोध्येत आदित्य ठाकरे फार कमी वेळ होते. पण इथं ते छाप पाडून गेले. महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशाने हे कार्यक्रम पाहिले. इथले स्थानिक सांगतात की, अनेक वर्षात इथे हा नेत्रदीपक सोहळा झाला नाही. या कार्यक्रमाला कोणतेही राजकीय स्वरूप नव्हते. शरयूच्या घाटावर जो सोहळा आपण अनुभवला तो आध्यात्मिक होता. या आरतीमध्ये आदित्य ठाकरे तन्मयतेने सहभागी झाले. हिंदुत्वाचा विचार घेऊन आदित्य ठाकरे आणि आम्ही येथे आलो आणि जातानाही तोच विचार घेऊन महाराष्ट्रात गेल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.’

‘वारंवार अयोध्येला येण्याचे खरे कारण म्हणजे अयोध्येच्या भूमीतूनच शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या कार्याला गती मिळाली.
त्यामुळे वारंवार आमची पावले अयोध्येकडे वळतात,’ असे सांगत राऊत म्हणाले की,
“आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. 1992 च्या आंदोलनात राज्यातून हजारो लोक या ठिकाणी आले आहेत.

केवळ शिवसेनेचे आले होते असे मी म्हणणार नाही. आजही इथले लोक बाळासाहेबांची आठवण काढतात. इथं महाराष्ट्रातून हजारो लोक येत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी इथे वास्तू असावी अशी विनंती मुख्यमंत्र्याकडे केली होती. त्यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारसोबत संवाद सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे अयोध्येशी असलेले नाते दर्शवणी भव्य अशी ही वास्तू असेल,” असेही राऊत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.