पुणे : पुण्याच्या मावळमध्ये प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुखवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून, त्याला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. ७० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१३ ते २०२० च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. ४८ वर्षीय तक्रारदार यांनी घाबरून तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांना बाबाराजेने जीवे मारण्याची धमकी दिली होती.
महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचे वाभाडे काढणाऱ्या आणि बिनधास्त बोलणाऱ्या बाबाराजेवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर हजारो फॅनफॉलोव्हर्स आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाराजेची मावळच्या बेबडओव्हळमध्ये गट नंबर १९६ या ठिकाणी असलेली पाच एकर जमीन वनीकरण विभागात समाविष्ट आहे. त्या जागेत प्लॉटिंग होत नाही. हे माहित असतानादेखील त्याने तक्रारदार यांना २५ गुंठे जागा २५ लाखांत विकली. त्याचे खरेदीखत न करीता आर्थिक फसवणूक केली. असे तक्रारीत म्हटले आहे.
खरेदी खत करायचे असेल तर आणखी ७० लाख रुपये खंडणी मागून ते न दिल्यास किंवा पोलिसांना याची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याला घाबरून तक्रारदार यांनी बाबाराजेला पाच लाख रुपये दिले. या प्रकरणी बाबाराजेला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे.