खडकवासलामधील गोळीबार प्रकरणात केशव अरगडे यांना जामीन

खेड पंचायती समिती अविश्‍वास ठरावानंतर सदस्यांवर झाला होता गोळीबार

0
पुणे : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर त्यांच्याच पक्षातील सदस्यांसह इतर पक्षांच्या सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केल्याचा रागातून खडकवासलातील एका हॉटेलात झालेल्या गोळीबार प्रकरणी न्यायालयाने केशव अरगडे याला जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी जामीन मंजुर केला.
हा प्रकार खडकवासला परिसरातील एका हॉटेलमध्ये 27 मे रोजी पहाटे घडला होता. त्याबाबत हवेली पोलीस ठाण्यात सभापती भगवान नारायण पोखरकर, जालिंदर नारायण पोखरकर, केशव आरगडे यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद काळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
खेड पंचायत समिती सदस्या सुनिता संतोष सांडभोर यांच्यासह 11 सदस्यांनी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे 24 मे रोजी सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे शिवसेनेचे सहा सदस्य, भाजपचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य खडकवासला गावच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलवर परिवारासह येऊन थांबले होते. दरम्यान, भगवान पोखरकर सर्व सदस्यांचा पाठलाग करत होते. त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना घेऊन ते हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये असलेल्या रूमचे दरवाजे तोडून महिला पंचायत समिती सदस्य आणि त्यांच्या पतींना कोयते, गज व लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. त्याबरोबरच गोळीबार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात अटक झाल्यानंतर अरगडे याने ॲड. सचिन ठोंबरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. एकाही साक्षीदाराने त्यांचे नाव घेतलेले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते दिसून येत नाहीत. पहाटे पाच वाजता ही घटना घडली असून, तब्बल आठ तास विलंबाने एफआयआर नोंदविण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्जदाराला जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. सचिन ठोंबरे यांनी केली. जखमींची प्रकृती चांगली आहे. तपास पूर्ण झाला असून गुन्ह्यातील जप्ती झाली आहे. आता त्यांच्याकडून जप्त करण्यासारखे काहीही राहिले नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने जामीन मंजूर केला.
Leave A Reply

Your email address will not be published.