पुणे : घर नावावर करून घेण्यासाठी आईला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या तीन मुलांसह पाच जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मुलगा अहमद अब्बास अली नईमाबादी, दीर नादीर ऊर्फ अब्दुल हसन नईमाबादी आणि दोन नणंदाना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर प्रमुख आरोपी असलेला मुलगा हुसेन अब्बास अली नईमाबादी याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी यापूर्वीच 15 हजाराचा नियमित जामीन दिला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी 15 हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन चौघांना मंजूर केला आहे.
ही घटना 15 जानेवारी रोजी घडली आहे. याबाबत 57 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. जानेवारीमध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यानंतर त्या एकट्या राहत असत. घटनेच्या दिवशी सर्वजण तिच्या घरात घुसले. घर नावावर करून देण्याच्या नावावर धिंगाणा घातला. त्यांना घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. हुसेन याने खुर्ची फेकून मारली. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सर्वांनी ॲड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. ॲड. घुगे यांना ॲड. सचिन जगताप आणि ॲड. सिरसीकर यांनी मदत मेली. घटना घडल्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी म्हणजे तब्बल सात ते आठ महिने विलंबाने एफआयआर दाखल केली आहे. ज्या घरावर वाद आहे. ते घरच मूळात मुलाच्या नावावर आहे. चौघांनाही मारहाणीचे कलम लागू होत नाही. त्यावेळी नादीर हा पुण्यात नव्हता. त्याने हैदराबाद येथे गेल्याचे 14 जानेवारी आणि 24 जानेवारी रोजी परत आल्याचे इंडीगो विमानाचा पुरावा सादर केला आहे. त्यामुळे सर्वांना अटकपूर्व जामीन देण्याची मागणी ॲड. श्रीकृष्ण घुगे यांनी केली.