पुणे : ”विधानसभा निवडणूकीवेळी भाजप आणि शिवसेना एकत्रित लढली होती. परंतु, निवडणुकीनंतर ज्यांनी दगा दिला त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सत्तेसाठी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांना जनता धडा शिकवेल असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सोमवारी (ता. 20) पत्रकारांशी बोलताना लगावला.
पुण्यातील कसबा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार्श्वभूमीवर विविध समाजाच्या शिष्टमंडळाशी भेटीगाठी केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्यावर कोणी काही बिनबुडाचे आरोप केले तर त्यांना करू दे, आम्ही कामातून उत्तर देऊ. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, भूमिका पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे ठाकरे यांची संपत्ती याबाबत आम्हाला कदापी मोह नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. ज्यांनी संपत्तीसाठी काही केले ते जनतेलाही माहिती आहे.
सीएम शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये मी मंत्री होतो परंतु मुख्यमंत्री नव्हतो. जनतेच्या विचाराचे काम आम्ही वेगाने करत आहे. अनेक शहरामध्ये विकास कामे करून कायापालट करण्यात येत आहे. अनेक समाजाचे लोक मला भेटले त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली आहे. अनेक जणांचे विविध विषय होते त्याबाबत बोलणे करण्यात आले. कसबा मधील जुने वाडे, पार्किंग, भिडे वाडा, वाहतूक कोंडी आदी बाबत लोकांचे प्रश्न होते मी त्यांच्याशी संवाद साधला. काही विषय लवकर सुटण्यासारखे तर काही धोरणात्मक विषय होते.
सीएम शिंदे म्हणाले, विरोधी पक्षनेते अजित पवार मतदारसंघात प्रचार करण्यासाठी असु दे, नाहीतर कोणी इतर असू दे.. मतदार ठरवतात कोणाला जिंकाव्याचे आणि कोणाला हरवायचे आहे. केंद्र सरकारचे पाठबळ मिळत असल्याने वेगाने युतीचे सरकार राज्यभरात काम करत आहे. त्यामुळे लोक उलटा प्रवास करत नाही असे मला वाटत आहे. पुण्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही विविध विकास कामातून करत आहे. ग्रामपंचायत मधील निवडणुकीत आम्ही राज्यात एक क्रमांकाची सरपंच पदे जिंकले होते.
सीएम शिंदे म्हणाले, निवडणूक आयोगाने खरी शिवसेना आणि धन्युष्य चिन्ह याबाबत योग्य निर्णय घेतला असून त्याचे स्वागत राज्यातील जनतेने केले आहे. आपल्या बाजूने निकाल लागला तर चांगले आणि विरोधात गेले की समोरची व्यवस्था चुकीची हे सांगणे योग्य नाही. आमच्याकडे बहुमत आहे आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र आहे, त्यामुळे गुणवत्तेवर हा निकाल निवडणूक आयोगाकडून लागला आहे.