पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या पुण्यातील पहिल्या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांनी तसेच पुणेकरांनी पाठ फिरविल्याचे रविवारी स्पष्ट झाले. मेळाव्याच्या निमित्ताने नेते उपस्थित होते.
मात्र मेळावा संपत आला तरी मेळाव्याला गर्दीच झाली नाही. त्यामुळे विराट मेळावा होणार, हा बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दावाही फोल ठरला. तसेच या गटाच्या शक्तीप्रदर्शनालाही मर्यादा आल्याचे दिसून आले.
शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर पुण्यातील काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक जण सहभागी होतील, तसेच काही नेतेही पक्ष प्रवेश करतील, असा दावा या गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नाना पेठेतील महात्मा ज्योतीराव फुले हायस्कूल येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री यांचे चिरंजीव, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षातर्फे पहिल्यांदाच जाहीर शक्तिप्रदर्शन केले जाणार होते. मेळाव्याची जबाबदारी शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे, आणि सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांच्याकडे होती. मात्र कार्यकर्त्यांनीच मेळाव्याकडे पाठ फिरविल्याने मेळावा चर्चेचा विषय ठरला.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिलाच मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर भवानी पेठेतील महात्मा फुले शाळेच्या मैदानावर शहर प्रमुख शहर प्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले यांनी मेळाव्याची जय्यत तयारी केली. या कार्यक्रमाला जवळपास अडीच हजार खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती. तर मेळाव्याच्या ठिकाणी ठरलेल्या वेळेपेक्षा श्रीकांत शिंदे हे तब्बल दोन तास उशीराने आल्याने श्रीकांत शिंदे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच असंख्य नागरिक निघून जाऊ लागले. त्यामुळे त्यांना भाषण उरकते घ्यावे लागले.