पुणे : ‘ओमायक्रॉन’ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. ख्रिसमस ‘थर्टीफर्स्टच्या ऐन हंगामात पुन्हा एकदा हॉटेल, रेस्टॉरंटवर पन्नास टक्के उपस्थितीचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव केल्याने रात्रीच्या पार्ट्यांवरदेखील बंदी येणार आहे. या नव्या निर्बंधांमुळे हॉटेल, रेस्टॉरंटसह नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत असणाऱ्या अनेक व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यातील निर्बंधांसंदर्भात शनिवारी (दि. 25) आदेश काढले. कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नाताळ, नववर्षाचे स्वागत, लग्नसराई आदी कारणांमुळे येत्या पंधरवड्यात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याद्वारे वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यात हे निर्बंध
हॉटेल, रेस्टॉरंट, जीम, स्पा, सिनेमा व नाट्यगृहे आसनक्षमतेच्या 50 टक्के मर्यादेच्या अधीन राहून सुरू ठेवण्यास मुभा राहील; परंतु एकूण आसनक्षमता आणि 50 % क्षमता याबाबतचा सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करावा.
विवाह समारंभ बंद जागेत आयोजित करतेवेळी अधिकतम शंभर जणांच्या उपस्थितीची मर्यादा पाळावी. मोकळ्या जागेत समारंभ करताना जास्तीत जास्त 250 व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 % यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करावे. अन्य सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये जेथे लोकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद जागेत आयोजित करतेवेळी अधिकतम 100 उपस्थितांची मर्यादा पाळावी, असे समारंभ मोकळ्या जागेत करताना जास्तीत जास्त 250 व त्याठिकाणच्या क्षमतेच्या 25% यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांची मर्यादा पाळावी. वर नमूद केलेल्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त इतर कार्यक्रमांचे आयोजन बंद जागेत करताना आसन व्यवस्था नक्की असलेल्या ठिकाणी त्या जागेच्या 50 % क्षमते इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करावे, तसेच बंद जागेत; परंतु आसन व्यवस्था नक्की नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम घेताना त्या जागेच्या 25% क्षमते इतक्या उपस्थितीची मर्यादा पाळावी. मोकळ्या जागेतले कार्यक्रम त्याजागेच्या क्षमतेच्या 25% उपस्थितीत घ्यावेत. क्रीडा स्पर्धा व सामन्यांचे आयोजन करताना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकतम 25% उपस्थितीत घ्यावेत.