प्रियकरासोबत फोन वर बोलणाऱ्या मैत्रिणीला बेदम मारहाण

0

पुणे : ‘बॉयफ्रेंड’ त्याच्या दुसऱ्या मैत्रिणीला सतत फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून प्रेयसीने आणि तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घडली आहे. हा वाद कशासाठी अशी विचारणा करणाऱ्या दुसऱ्या मैत्रिणीला देखील या प्रेयसीने आणि दोन मैत्रिणी व चार मित्रांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण करून शर्ट फाडला. हा सगळा गोंधळ रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पुणे शहरात घडला आहे.

याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रेयसी, तिच्या दोन महिला सहकारी मैत्रिण आणि चार अनोळखी मुले यांच्यावर विनयभंग तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीची आणि प्रियकराची प्रेयसी अंकिता (नाव बदलेले आहे) या मैत्रिण आहेत. त्या एकमेकांना चांगल्या ओळखतात. वैराज (नाव बदलेले आहे) आणि अंकिता यांचे गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.

दरम्यान, अंकिता प्रियकर वैराज हा तक्रारदार हिची मैत्रिण (संगिता) हिच्याशी फोनवर बोलत असत. हा प्रकार अंकिता हिला समजला. त्यावेळी तिला याचा खूप राग आला. तसेच, या दोघांत प्रेमसंबंध असल्याचा संशय देखील तिच्या मनात आला. त्यावरून दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ससाणेनगर परिसरात अंकिताने संगिता हिला गाठले व तिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

तसेच, तिला हाताने मारहाण देखील केली. याचवेळी तक्रारदार तरुणी तेथे आली व तिने “काय झालंय, इथं का तमाशा करतेस,” असे विचारले. याचाही राग अंकितला आला. त्यावेळी अंकिता सोबत असणाऱ्या तिच्या दोन मैत्रिणी आणि चार अनोळखी मुलांपैकी एकाने तक्रारदार तरुणीचा हात धरून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच कानशिलात लगावली. तर, दुसऱ्या मुलाने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला.

हा वाद इतका विकोपाला गेला की नंतर सर्वांनी मिळून तक्रारदार व तिची मैत्रिण संगिता यांना बेदम मारहाण केली. यात या दोघींना दुखापत झाली आहे. हा सर्व प्रकार काही मिनिटे सुरू होता. त्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.