पिंपरी : शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांना तरुणाने मारहाण करून धक्काबुक्की केली. तसेच पळून जाण्याचा प्रयत्न करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
ही घटना बुधवारी (दि. 7) नाणेकरवाडी गावात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ईश्वर उर्फ अक्षय गोविंद पाटील (वय 25, रा. नाणेकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार नितीन गुंजाळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर याच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल आहे. त्यामुळे फिर्यादी पोलीस अंमलदार नितीन गुंजाळ आणि पोलीस नाईक साबळे बुधवारी त्याच्या घरी गेले.
त्यावेळी आरोपी दरवाजाच्या मागे लपलेला होता. त्याला ताब्यात घेत असताना आरोपीने फिर्यादी पोलीस अंमलदार आणि पोलीस नाईक यांना हाताने मारहाण केली. तसेच धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना दुखापत केली. याबाबत आरोपीला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.