पुणे : अभ्यास केला नाही म्हणून सात वर्षांच्या मुलीला लाटणे आणि हाताने मारणा-या पित्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित पित्याला अटक केली आहे. मारहाणीत संबंधित मुलीचा हात फॅक्चर झाला आहे.
नागेश महादेव जाधव (वय ३६, रा. भाजी मार्केट, ताडीवाला रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे. याबाबत आरोपी यांच्या शेजारी राहणा-या मिनाज विशाल भोले (वय २४, रा. ताडीवाला रोड) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित मुलगी ही तिच्या आर्इ-वडिलांसह ताडीवाला रस्त्यावर असलेल्या भिमसेवा तरुण मंडळासमोर रहायला आहे. अभ्यास करीत नाही म्हणून नागेश याने तिला मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लाटणे आणि हाताने मारहाण केली. त्यानंतर तिच्या आर्इला शिवीगाळ केली.
मारहाणीत मुलीचा हात फॅक्चर झाला आहे. त्यामुळे उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपीने यापूर्वी देखील मुलीला अभ्यासावरून मारहाण केली होती. तो दररोज कोणत्याना कोणत्या कारणावरून मारहाण करीत, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. नागेश याने मुलीची लैंगिक छळ केला आहे का? याचा तपास करायचा आहे. तसेच गुन्ह्याच्या इतर तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.