भाजपमध्ये असल्याने कोणती चौकशी नाही की काही नाही; शांत झोप लागते : हर्षवर्धन पाटील

0

पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू केलं होतं. या इनकमिंगमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा देखील नंबर लागला होता. भाजपने सुरू केलेल्या इनकमिंगबाबत बोलत असताना केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमध्ये आल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी होतो असं विधान केलं होतं. हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी बोलत असताना ते भाजपमध्ये का सामील झाले याचं खरं कारण गंमती गंमतीत सांगून टाकलं.

हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचं सरकार असताना राज्यात सहकारमंत्री होते. राज्यात भाजपची सत्ता येईल आणि आपण पुन्हा मंत्री होऊ अशी आशा त्यांच्या मनी दाटून आल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं ज्यामुळे भाजपसोबत पाटील यांचंही स्वप्न भंगलं होतं.

पाटील यांनी मावळमध्ये बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात म्हटलं की ”आमदार साहेब म्हणाले मी आहे तिथे सुखी आहे. तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. माऊली आमच्या शेजारी बसल्या आहेत. स्टेज गंमतीशीर आहे. आता आम्हलाही भारतीय जनता पक्षात जावे लागले. ते म्हणाले का गेला? मी म्हणालो ते तुमच्या नेत्याला विचारा. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेले? ते म्हणाले, तेवढं सोडून बोला. पण मी तुम्हाला सांगतो, काही नाही…. मस्त आहे निवांत आहे. भाजपमध्ये असल्याने शांत झोप लागते. काही चौकशी नाही काही नाही. मस्त वाटतंय”. पाटील यांनी जेव्हा हे विधान केले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या शेजारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे काही पदाधिकारी मंचावर बसले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.