पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही त्यांनी एका मुलाखतीत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांनी मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुंबईत भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे नेते वरुन देसाई, राष्ट्रवादीचे अभय मांढरे उपस्थित होते. त्यामुळे रुपाली पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुढील दोन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे.