दिल्ली : आज सकाळ पासूनच दिल्लीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे. यामुळे सर्व राजकीय मंडळींचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे. यातच आता मंगळवारी सायंकाळी विरोधकांची बैठक होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी होणाऱ्या या।बैठकीमध्ये १५ पक्षांचे नेते सहभागी होणार आहे.
आजारपणानंतर शरद पवार दिल्लीत गेले आहेत. सोमवारी त्यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची आपल्या निवासस्थानी भेट घेतली. यापूर्वी मुंबईतही पवारांनी किशोर यांची भेट घेतली होती. त्यावेळी किशोर हे सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी आले होते आणि आपण या बेठकीमध्ये केवळ उपस्थित होतो, असे स्पष्टीकरण पवारांनी दिले होते.
मात्र, आता पवार किशोर यांच्याशी वैयक्तिक भेट घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मंगळवारी सायंकाळी विरोधी पक्षांतील नेत्याची मोठी बैठक पवारांच्या निवासस्थानी पार पाडणार आहेत. भाजपमधून बाहेर पडलेले यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्र मंच या झेड्यांखाली विरोधक एकत्र येणार आहेत.
या बैठकीमध्ये यशवंत सिन्हा, राजदचे मनोज सिन्हा, आपचे संजय सिंह यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी आणि काही इतर विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीत काँग्रेसकडून उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधीबाबत अद्याप माहिती मिळाली नाही वा काँग्रेस या बैठकीत सामिल होणार का ? याविषयी देखील समजलेले नाही.
मात्र, शरद पवार या बैठकीच्या माध्यमातून विरोधकांची पुन्हा एकदा मूठ बांधत असल्याचे दिसते आहे. शिवाय ते यूपीएला पर्याय देखील उभा करत असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाअंतर्गत असलेल्या यूपीएचे या विरोधा पक्षाच्या गटाचे नेतृत्व शरद पवारांकडे द्यावे, अशी मागणी होत आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून घेण्यात येणारी बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.