मुंबई : राज्यात18 महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहेत, याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. अगोदर ओबीसी जनगणना करण्याच्या सूचना दिल्या असून त्यानंतर निवडणुका होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय दिला असून ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपंचायत निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील सर्वच पक्षांची निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्याचे न्यायालयाने सांगितल्याने ओबीसी समाज काहीसा नाराज आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव दौरा केला. त्यात बोलताना ‘सरकारने मार्च महिन्यांपर्यंत ओबीसी जनगणना पूर्ण करायची तयारी केली आहे. त्यानंतर पुन्हा प्रभागरचना, आरक्षण सोडती निघतील. यानंतरच या निवडणुका होतील’, असे संकेत पवार यांनी दिले. महापालिका निवडणुका एप्रिल अखेरीस अथवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगालाही निवडणुका पुढे ढकलण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या नगरपंचायत निवडणुका वगळता अन्य निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आहे, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमल्यास सरकारला फायदा होणार असून निवडणुका घेणे देखील सुकर होणार आहे. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच सध्या ओमायक्रोन व्हेरियंटचा फैलाव वेगाने होत असून त्यावर उपाययोजना करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. निवडणुकांमध्ये संयम पाळून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.