आगामी सार्वत्रिक निवडणुकीत युवकांवर मोठी जबाबदारी : संजोग वाघेरे पाटील
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहर पदाधिका-यांची नियुक्ती
पिंपरी : फेब्रुवारी 2022 दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेवर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता पुन्हा आणण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व मार्गदर्शक खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व काम करणार आहोत.
या निवडणुकीत युवकांवर मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी युवकांनी आपआपल्या प्रभागात संपर्क अभियान राबवावे तसेच महानगरपालिकेशी संबंधित असणा-या स्थानिक समस्या जाणून घेऊन त्यावर आवाज उठवावा असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
मंगळवार (दि.2 मार्च) चिंचवड स्टेशन येथे झालेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारणी पदाधिका-यांना व वॉर्ड स्तरीय निवड झालेल्या कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष रविकांत वरपे, शहर प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, लाला चिंचवडे तसेच शेखर काटे, योगेश गवई, अमोल भोईटे आदी उपस्थित होते.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, वीज, पाणी, रस्ता या मुख्य समस्या प्रामुख्याने शहरात जाणवत आहेत. यासाठी राष्ट्रवादीच्या युवकांनी दररोज किमान दहा नागरिकांशी संपर्क साधावा. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही वाघेरे पाटील म्हणाले.