चांगल्या परताव्याचे आमिष देत अनेक व्यवसायिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा महाठग मोकाट
पिंपरी : व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून ठरलेला परतावा तसेच मूळ रक्कम लोकांना परत न करता अनेकांची फसवणूक केली. प्रकरण दाबण्याच्या हेतूने पोलिसांना हाताशी धरून गुंतवणूकदारांवर बेकायदेशीर सावकारीचे खोटे गुन्हे दाखल केले व त्यांना अटक करण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून स्वतः मोकाट फिरणाऱ्या स्वप्नील गणपत बालवडकर या आर्थिक माफियाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी सुनंदा रमेश हजारे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सराईत आर्थिक माफिया स्वप्नील बालवडकर याच्या आर्थिक कारनाम्याची माहिती देण्यासाठी सुनंदा रमेश हजारे यांनी शुक्रवारी (दि.15) चिंचवड येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांचा मोठा मुलगा व उद्योजक आतिश रमेश हजारे, लहान मुलगा व उद्योजक अनिकेत रमेश हजारे, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक उपस्थित होते.
सुनंदा हजारे म्हणाल्या, ‘स्वप्नील बालवडकर हा सराईत आर्थिक फसवणूक करणारा माफिया आहे. त्याने पुणे पोलिसांना हाताशी धरून लोकांना ठगवण्याचा धंदा सुरू केला आहे. माझा मुलगा अनिकेत हजारे क्रशर व्यवसायिक असून, त्याची देखील 3 कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक त्याने केली आहे. त्यासंदर्भात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बालवडकर याने अनिकेतचा विश्वास संपादन करून त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी ग्वाही दिली. सुरुवातीला काही रक्कम परतावा म्हणून दिली, पण त्यानंतर स्वप्नील याने गुंतवणुकीची रक्कम व नफा देण्यास नकार दिला, अशी माहिती त्यांनी दिली.
सुनंदा हजारे पुढे म्हणाल्या, ‘स्वप्नील याने पुणे पोलिसांना हाताशी धरून अनिकेत विरोधात बेकायदेशीर सावकारी नियंत्रण कायद्याअंतर्गत 28 डिसेंबर 2021 रोजी खोटा गुन्हा दाखल केला. चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी आठ तास आम्हाला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले आणि अरेरावीच्या भाषेत चौकशी केली.’ असा आरोप हजारे यांनी केला.
‘माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या सहकार्याने आम्ही याबाबत 14 ऑक्टोबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे याबाबत तक्रार अर्ज दाखल केला. सर्व कागदपत्रांचा अभ्यास करून आठ महिन्यांनंतर भोसरी पोलिसांनी स्वप्नील बालवडकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुणे पोलिसांनी मात्र एका दिवसात कसलीही चौकशी न करता अनिकेत हजारे याला अटक केली. त्यामुळे पुणे पोलिसांची कारवाई संशयास्पद आहे.’ असा आरोप सुनंदा हजारे यांनी केला.
दरम्यान, न्यायालयात देखील हे प्रकरण टिकाव धरू शकले नाही व दुसऱ्या दिवशी अनिकेत याला जामीन मिळाला. 90 दिवस होऊन गेले तरी देखील पोलीस त्या प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकलेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
स्वप्नील बालवडकर याच्या फसवणूक प्रकाराला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल करावी,’ असे आवाहन हजारे यांनी केले. या प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाकडे देखील दाद मागितली असल्याचे हजारे यांनी सांगितले.