मुंबई : देशावर कोरोनाची महामारी आहे, नव्या स्वरूपातील कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हे संकट असताना राज्यात ‘बर्ड फ्लू’चे नवे संकट आले आहे. पंजाब, राजस्थान, झारखंड पाठोपाठात ठाण्यात पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेश व अन्य काही जवळच्या राज्यात बर्ड फ्लूची साथ आली असतानाच ठाणे येथील विजय गार्डन या सोसायटीच्या उद्यानातील तब्बल १५ बगळे बुधवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आले. ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांना एकत्र करून लॅबमध्ये तपासणीकरिता पाठवले आहे. यामागचे कारण तपासणीचा अहवाल आल्यावरच कळणार असल्याचे वनाधिकारी नरेश मुठे यांनी सांगितले.
पंजाब, राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात मरून पडलेले सापडत आहेत. त्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूबाबत ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही राज्यांमध्ये अनेक पक्ष्यांचा मृत्यू हाेत असून पाच राज्यांनी बर्ड फ्लूमुळे हे मृत्यू हाेत असल्याचा दुजाेरा दिला आहे. त्यामुळे या आजाराचा धाेका लक्षात घेऊन अनेक राज्यांनी ॲलर्ट जारी केला आहे.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.केरळमध्ये काही दिवसांपूर्वी १२ हजार बदकांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्येही अनेक पक्षी मृतावस्थेत आढळले हाेते. हे मृत्यू बर्ड फ्लूमुळे हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
काही राज्यांमध्ये एच५एन८ हा ‘बर्ड फ्लू’ विषाणूचा स्ट्रेन आढळला आहे. याचा मानवी संसर्ग झाल्याचे भारतात अद्याप निदर्शनास आलेले नाही. n संसर्ग राेखण्यासाठी कच्ची अंडी, कच्चे मांस खाऊ नका. मांस याेग्य प्रकारे शिजवून घ्या.