पिंपरी : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम महागाई आणली आहे. मित्रांचा फायदा होण्यासाठी सर्वसामान्यांना लुटण्याचे काम सुरू आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचासभेत बोलत होते.
चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. तर कसब्यात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली असून, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत.
नाना पटोले म्हणाले की, मी कॉलेजमध्ये असताना शीला दीक्षितचे सरकार कांद्याचे भाव वाढल्यामुळे पडले. मात्र, आज सगळीकडे महागाई आहे. किराणा दुकान वगैरे. खरे तर केंद्र सरकराने ही कृत्रिम महागाई आणली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठे कच्च्या तेलाचे भाव कमी असताना मित्रांचा फायदा होण्यासाठी सर्वसामान्यांना लुटण्याचे काम सुरू आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, या लोकांना सत्तेची गुर्मी आली आहे. लोकसभेत पंतप्रधानांनी पानटपरीवरल्या सारखे भाषण केले. ही किती मेंड. मात्र, या घमेंडीचा अंत होतो, असे आपण रामायणातही पाहिले आहे, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. चिंचवडमधल्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांचीही भाषणे झाली.
अजित पवार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख केले. आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून पुढे आणले. मग इतरांना आक्षेप कसला, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेनेत दोनदा बंड झाले. मात्र, त्याही निवडणुकीत बंडखोरी करणारे पडले. इजा बिजा झाली.आता तिजा दाखवायची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला.