भाजपच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांचा नगरसेविकापदाचा राजीनामा

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. शहरातील भाजपची गळतीचे सत्र सुरु झाले आहे. पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक 29 चे महापालिकेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या चंदा लोखंडे यांनी आज (सोमवारी) नगरसेविकापदाचा राजीनामा दिला. आयुक्त राजेश पाटील यांनी तो राजीनामा स्वीकारला. त्यामुळे भोसरीपाठोपाठ आता भाजपला चिंचवडमधून दुसरा धक्का बसला आहे.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला गळती सुरु झाली आहे. चार दिवसांपूर्वी मोशीचे वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मनगटावर घड्याळ बांधले आहे. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चंदा लोखंडे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन भाजपला दुसरा धक्का दिला.  महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत पिंपळेगुरव, वैदूवस्तीमधून लोखंडे भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्यांनी महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपदही भूषविले.

भाजप नेतृत्वाला कंटाळून त्यांनी आज नगरसेविकपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी  21 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. लोखंडे हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. पण, त्यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नीने नगरसेविकापदाचा राजीनामा दिला असून त्याही लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोखंडे यांचा राजीनामा आमदार जगताप यांना धक्का असल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.