पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिक्त झालेल्या स्थायी समिती सदस्यपदी भाजपच्या नगरसेविका सुजाता पलांडे यांची आज सोमवारी पालिकेच्या ऑनलाईन सभेत निवड करण्यात आली आहे.
महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पक्षनेते ढाके यांनी बंद पाकिटातून पालांडे यांचे नाव महापौरांकडे दिले. त्यानुसार महापौरांनी पालांडे यांच्या नावाची घोषणा केली.
सभेला गैरहजर राहिल्याने भाजपचे भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे यांचे महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्यपद रद्द झाले आहे. समितीच्या बैठकांना हजर न राहिल्याने नियमानुसार त्यांचे सदस्यपद रद्द झाले. त्यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिला होता. त्यांचा राजीनामा पक्षाकडून मंजूर झाला होता.
महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी सदस्यपद रिक्त ठेवता येत नाही. प्रशासकीय पातळीवर नवीन सदस्य नियुक्तीची कार्यवाही सुरू होती. आजच्या सभेत पालांडे यांची सदस्यपदी निवड झाली असून त्यांना चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.